नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी आज ‘कोविड इंडिया सेवा’ या संवादात्मक सवेची सुरुवात केली. covid-19 आजारासंदर्भात सर्वसामान्यांना योग्य माहिती पुरवण्यासाठी या सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. जनतेला कोविड इंडिया सेवा या ट्वीटर हॅंडलवर आपले प्रश्न पोस्ट करता येतील. या प्रश्नांना प्रशिक्षित विशेषज्ञांकडून उत्तरे दिली जातील. ही माहिती मिळवण्यासाठी कुठलेही वैयक्तिक तसेच वैद्यकीय तपशील नोंदवण्याची गरज नाही.

या सेवेच्या माध्यमातून विशेषज्ञांद्वारे  covid-19 संबंधातली खात्रीशीर माहिती लोकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्वीट संदेशात व्यक्त केला आहे.

covid-19 विरूद्धच्या लढाईत सहभागासाठी इच्छुक असलेल्या वैद्यकीय व्यावसायिक तसेच स्वयंसेवकांची माहिती covidwarriors.gov.in या वेबसाइटवर संकलित करण्यात आली आहे. आतापर्यंत एक कोटी 24 लाख कोरोना वॉरियर्सची नोंद झाली असून हे स्वयंसेवक सोशल डिस्टन्सिंग, अत्यावश्यक सेवा पुरवणं, कंटेनमेंट झोनमध्ये देखरेख करणं या कामात सहभागी होतील. आतापर्यंत एक लाखाहून अधिक आयुष डॉक्टर्स तर 55 हजाराहून अधिक आयुष विद्यार्थ्यांनी आपलं covid-19 विरोधातला प्रशिक्षण पूर्ण केलं असून ते या लढ्यात सहकार्य देण्यास तयार आहेत.