माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक महाराष्ट्राने गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या निधनाने माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक आज महाराष्ट्राने गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली शोकभावना व्यक्त केली आहे.

कादंबरी, लघुकथा, नाटक, आत्मकथन यासारख्या साहित्य प्रकारात त्यांनी लिलया वावर केला. उपेक्षित वंचित समाजाच्या वेदना आणि व्यथा यांना त्यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली. लेखनीवर मनापासून प्रेम करणाऱ्या श्री.तुपे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती या पुस्तकांनी वाचकांच्या मनावर गारुड निर्माण केलं.

त्यांच्या लेखणीतून चित्रित झालेली सामाजिक वास्तविकता आणि सचोटी जीवनातील संघर्षावर परखडपणे भाष्य करत असल्याने  ती वाचकांना अंतर्मुख करत असे, असेही श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे.