नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या जगद्व्यापी महामारीमुळे परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी केंद्र सरकारने महा अभियान सुरु केले आहे. वैद्यकीय कारणं किंवा व्हिसाची मुदत संपलेल्या भारतीय नागरिकांनाच आत्ता परत आणणार असून अनिवासी भारतीयांचा त्यात समावेश नसल्याचे सरकारने सांगितले आहे. यानुसार परदेशात अडकलेले  रोजगार गमावलेले विस्थापित मजूर, अल्प काळासाठीच्या विसा ची मुदत ज्यांची संपली आहे, गर्भवती महिला तसेच वैद्यकीय उपचारांची तात्काळ गरज असलेल्या व्यक्तींना भारतात आणण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.

या प्रवासाचे शुल्क आकारले जाणार असून भारतात परतल्यावर कमीतकमी १४ दिवसांच्या विलगीकरणात जाण्याचे आश्वासन या व्यक्तींनी प्रवासापूर्वी देणे बंधनकारक आहे.  विमानात प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाईल, तसेच विमानामध्ये सुरक्षित सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे.

भारतामधून अन्य देशात जाण्याची परवानगी केवळ कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच मिळणार असून, या प्रवासाचे शुल्क आकारले जाईल, तसेच संबंधित नियम बंधनकारक आहेत.

भारतीय नौदलाची जलाश्व आणि मगर ही दोन जहाजे माले आणि मालदीव मधे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी निघाली आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार भारतीयांची सुटका करण्यात येणार असून त्यांना प्रथम केरळात कोची इथे उतरवण्यात येईल. तिथून संबंधित राज्यसरकारांकडे त्यांचा ताबा दिला जाईल.