नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाची कुठलीही लक्षणं नसलेल्या मात्र कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांना आठवडाभरात घरी पाठविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. घरी पाठविण्यापूर्वी २ ऐवजी एकच चाचणी या रुग्णांची करण्याचाही प्रयत्न आहे. त्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या दिशानिर्देशांची प्रतिक्षा करत आहोत.
यामुळे कोरोना चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळांवर येणारा ताण कमी व्हायला मदत होईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. सध्या राज्यात ५४ ठिकाणी दिवसाला ८ ते १० हजार चाचण्या होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यात सध्या ९४३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांनी राज्यातल्या ५० लाख घरांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणं आहेत का, याची तपासणी केली आहे.
कोरोनाची लक्षणं नसलेल्या मात्र कोरोनाग्रस्त असलेल्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी रेल्वे, लष्कर आणि केंद्र सरकारच्या इतर आस्थापनांची रुग्णालयं उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना केली होती. त्यानुसार रेल्वेच्या रुग्णालयांची सेवा राज्यासाठी उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.