नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 मुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला दारुण अपयश आल्याचा आरोप करत प्रदेश भाजपानं आज राज्यव्यापी महाराष्ट्र बचाव आंदोलन छेडलं आहे.

कोविड 19 मुळे नागरिकांचे प्राण जात असताना हे सरकार पूर्णपणे दिशाहीन, अनुभवशून्य आणि समन्वयहीन ठरलं असून ते विषाणूपेक्षाही घातक असल्याचं ट्वीट पक्षानं केलं आहे. मुंबईत पक्षाच्या मुख्यालयासमोर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. राज्यात इतरत्रही पक्षकार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करावेत, शेतकरी-बारा बलुतेदार तसंच असंघटीत कामगारांसाठी राज्य सरकारनं ५० हजार कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं, अशी मागणी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना  केली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारनं कोणत्याही प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत, अशी टीका फडनवीस यांनी केली. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत काहीही मदत नाही, कापूस खरेदी फक्त सीसीआय अर्थात भारतीय कापूस परिषदेकडूनच सुरू आहे, राज्य सरकारी यंत्रणा कापूस खरेदी करत नसल्याचं फडनवीस यांनी सांगितलं.

कोल्हापूर इथं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं, कोरोना प्रादुर्भावावरच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सर्व यंत्रणांशी समन्वय साधणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी सांगितलं. पोलिसांवरचे हल्ले थांबायला हवेत, असंही पाटील म्हणाले.

औरंगाबाद इथं खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. सरकारनं या आंदोलनाची दखल घेत, सर्वसामान्यांसाठी पॅकेज जाहीर केलं नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सावे यांनी दिला.

परभणी इथं आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला.

नांदेड इथं भाजपा राज्य कार्यकारिणीचे सदस्य चैतन्यबापू देशमुख यांनी तर अर्धापूर इथं विधीज्ञ किशोर देशमुख आणि इतरांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.

लातूर जिल्ह्यातही भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेउन आंदोलनात सहभाग नोंदवला. लातूरचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी काळे मास्क, काळी पट्टी बांधून, हातात काळे रिबीन दाखवून निषेध व्यक्त केला. भाजपचे शहर अध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी उपमहापौर देवीदास काळे, शैलेश लाहोटी यांनी दंडाला काळ्या पट्‌या बांधल्या होत्या. अनेक कार्यकर्त्यानी त्यांच्या घरासमोरच हातात फलक घेउन आंदोलन केलं.

धुळे शहरात काळे झेंडे, फलक दाखवत भाजपा खासदार डॉक्टर सुभाष भामरे, यांच्यासह अनेकांनी आंदोलन केलं.

गडचिरोलीत खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.