नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ वर उपचारांसाठी CSIR म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं विकसित केलेल्या औषधाची चाचणी घेण्यासाठी भारतीय औषध महानियंत्रक कार्यालयानं परवानगी दिली आहे. CSIRचे महासंचालक शेखर मांडे यांनी आकाशवाणीला खास मुलाखतीत ही माहिती दिली. फायटोफार्मास्युटीकल आणि फावीपिरावीर नावाच्या या औषधांची चाचणी येत्या आठवडाभरात सुरु होईल, असं त्यांनी सांगितलं. फावीपिरावीर हे औषध चीन,जपान आणि इतर देशांमधे मधे फ्लूवरती प्रभावी ठरलं आहे, तर फायटोफार्मास्युटीकल हे औषध वनस्पतींपासून बनवलं आहे. औषध निर्मितीविषयी विविध कंपन्यांशी CSIR ची चर्चा चालू असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोविड १९ विरुद्ध विविध पातळ्यांवर लढा उभारताना CSIR ने विविध प्रारुपांचा वापर केला आहे. SARS-CoV-2 या कोरोना विषाणू मानवी शरीरावर निष्प्रभ ठरावा याकरता प्रतिकारक अँटीबॉडीज विकसित करण्याच्या प्रकल्पाला परिषदेनं मंजुरी दिली आहे. कोविड १९ मधून बरे होणाऱ्या रुग्णांपासून या प्रतिरोधक पेशींचे क्लोन विकसित केले जाणार आहेत.