नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विद्यापीठांच्या अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडवावा, असं विद्यापीठांचे कुलपती या नात्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षाही रद्द करण्याची मुभा मिळावी, असं पत्र उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठवलं होतं, मात्र याची माहीती आपल्याला दिली नव्हती, याबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पदवी प्रदान करणं विद्यापीठ कायद्याचा तसंच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचा भंग ठरेल, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षण आणि रोजगारावर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं राज्यपालांनी मुक्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. परीक्षा रद्द करण्याबाबत युजीसीला पाठवलेलं पत्र आणि मागणी हा अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा प्रकार असून, याबाबत सामंत यांना योग्य त्या सूचना करण्याचे निर्देशही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.