मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतला पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली या जिल्हयांतील कोरोना परिस्थितीबाबत ‍विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख, ससून रुग्णालयाचे अधीष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे आदी सहभागी झाले.

डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात कोरोना प्रतिबंधासाठी शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय तयार होणाऱ्या नवीन हॉटस्पॉटवर देखील लक्ष देण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात देखील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे या भागातील रुग्णदर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाययोजना करत आहेत. परराज्य व परजिल्हयातून प्रवास करुन आलेल्या तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व श्वसनाशी संबंधित आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह असणारे नागरिक, गरोदर महिला, लहान बालके यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येत आहेत.

शासनाच्या नियमानूसार दर आकारणी न करता जादा दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा पातळीवर समितीची स्थापना करण्यात आली आहे. अशा रुग्णालयाची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाल्यास त्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी संबंधित अधिकारी व रुग्णालय प्रमुखांशी वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधून आवश्यक त्या सूचना देवून प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. पावसाळयाच्या तोंडावर कोरोना संसर्गाबरोबरच डेंग्यू, मलेरिया, स्वॉइन फ्ल्यू अशा अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी यावेळी दिली.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच झोपडपट्टी व प्रतिबंधीत क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर भर देण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगलीचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, शेखर सिंह, मिलिंद शंभरकर, दौलत देसाई व डॉ.अभिजीत चौधरी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआपल्या जिल्हयातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रशासनाच्या अडचणी व राज्य शासनाकडून अपेक्षीत मदतीबाबत चर्चा करण्यात आली.