६ लाख ०३ हजार व्यक्ती क्वारंटाईन; ६ कोटी २२ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख४४ हजार ३३३ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख ०३ हजार ७४१ व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १ जून  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख २१ हजार २३० गुन्हे नोंद झाले असून २३ हजार ६५१ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी २२ लाख ४९ हजार ९५१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कडक कारवाई

 कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २५८ घटना घडल्या. त्यात ८३८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर-९९ हजार फोन

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  ९९ हजार ५१६ फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे अशा ७०६ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६ लाख ०३ हजार ७४१ व्यक्ती क्वारंटाईन Quarantine  आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३० वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७७ हजार ४२५ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने   मुंबईतील १५ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण १६, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा २८ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १८८ पोलीस अधिकारी व १३०१ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रिलिफ कँप

राज्यात सध्या एकूण ८०७ रिलिफ कँप आहेत. त्या ठिकाणी सुमारे ३७ हजार ८९० लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.