मुंबई (वृत्तसंस्था) : लॉक उघडायला सुरुवात केली असल्यामुळे राज्य सरकारपुढं आव्हान आहे, पण सर्वांच्या सहकार्यानं ते निश्चितपणे पेलू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात हिजवडी इथं विप्रोच्या कोविड रुग्णालय उद्घाटन करताना ते बोलत होते.

पब्लिक-प्रायव्हेट प्रोजेक्ट तत्वावर उभारलेल्या देशातील या पहिल्यावहिल्या कोविड रुग्णालयाचं आजपासून लोकार्पण होतंय, ही महाराष्ट्रासाठी समाधानाची बाब आहे. विप्रोनं उभारलेल्या या ५०४ बेड्सच्या अद्ययावत कोविड केअर रुग्णालयात १८ व्हेंटीलेटर्स, आयसीयू सुविधा, आणि इतर सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत, असं त्यांनी सांगितलं.

दोन आधीच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रानं कोरोनाची लढाई सुरु केली त्यावेळी आरोग्य सुविधा पुरेशा नव्हत्या. सुरुवातीला राज्याकडे केवळ २ प्रयोगशाळा होत्या, आता ८० ते ८५ प्रयोगशाळा झाल्या असून लवकरच त्या १०० पर्यंत जातील. सुरुवातीला आमच्यासमोर पीपीई किट्स, एन ९५, व्हेंटीलेटर्स कुठून आणायचे हा प्रश्न होता. आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

२ लाख ३० हजार पीपीई, ४ लाख २० हजार एन ९५ मास्क आपल्याकडे आहेत. पूर्वी ३ आयसोलेशन केंद्रे होती आणि केवळ ३५० बेड्स होते. आज आमच्याकडे १४८४ कोविड सेन्टर्स, २.५ लाख बेड्सची सुविधा आहे. मोठ्या शहरांमध्ये आम्ही जम्बो सुविधा निर्माण करीत आहोत. केवळ फिल्ड हॉस्पिटल्स उभारून चालणार नाही तर त्यात काम करायला डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ लागणार आहे. तोदेखील सर्व माध्यमांतून आम्ही तयार करीत आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.