नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी उठवायला सुरुवात केल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांमधल्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज २१ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शासनप्रमुखांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.

विजेचा घटलेला वापर आता वाढला आहे, गेल्या महिन्यात खतांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली, गेल्या वर्षीच्या तुलनेत खऱीपच्या पेरण्यांमधे चांगली वाढ दिसते आहे, दुचाक्यांचं उत्पादन वाढलं आहे, किरकोळ खरेदी-विक्रीत डिजिटल पेमेंट पूर्वीच्या पातळीवर आलं आहे, पथकर संकलन वाढलंय, आणि निर्यातही वाढू लागलीय, या उत्साह वाढवणाऱ्या गोष्टी आहेत, असं मोदी म्हणाले. या संकटाचं संधीत रुपांतर करा, असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. लोकांचं आयुष्य आणि त्यांची उपजीविका, या दोन्हींवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल, असं ते म्हणाले.

वेळीच निर्णय घेतल्यामुळे सरकारला देशात करोना विषाणूचा प्रसार रोखता आला, असं ते म्हणाले. गेल्या काही आठवड्यांमधे हजारो भारतीय परदेशातून भारतात परतले, आणि लाखो स्थलांतरित मजूरही त्यांच्या मूळ गावी पोचले. मात्र तरीही कोविड १९ चा प्रभाव जगातल्या इतर भागांइतका भारतात दिसत नाही, असं मोदी म्हणाले. कोविडचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही ५० टक्क्याच्या वर गेलंय, असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही आठवड्यांमधल्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. प्रधानमंत्री उद्या महाराष्ट्रासह इतर १५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शासनप्रमुखांशी संवाद साधणार असून त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे.