मुंबई : राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणूका दि.18 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्याच्या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी शासनाने दि. 31 मे, 2020 रोजीच्या आदेशान्वये राज्याचा लॅाकडाऊन कालावधी दि. 30 जून, 2020 पर्यत वाढवला आहे.

तसेच अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदविस वाढ होत आहे. अशावेळी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे उचित होणार नाही. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतुदीनुसार ज्या प्रकरणी मा. उच्च अथवा मा.सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घेण्याचे आदेशित केले आहे. अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढील तीन महिन्यांपर्यत पुढे ढकलण्यात येत असल्याचेही सहकारमंत्री श्री. पाटील यांनी संगितले.