पुणे : प्रधानमंत्रीकिसान सन्मान निधी योजनेतून एकही पात्र लाभार्थी शेतकरी सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.

येथील कृषि आयुक्तालयाच्या पद्मश्री सभागृहात कृषि मंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे कृषि विभागाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, कृषि आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, फलोत्पादन संचालक श्री. पोकळे, मृदसंधारण संचालक श्री. मोटे, कृषि सहसंचालक दिलीप झेंडे आदि उपस्थित होते.

कृषि मंत्री डॉ.अनिल बोंडे म्हणाले की, कृषि विभागांतर्गत शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे खते उपलब्ध करुन देणे, कृषि पतपुरवठा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामानावर आधारीत फळपिक योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अशा अनेक योजना राज्यात राबविण्यात येत असून या सर्व योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यत पोहचवणे आवश्यक आहे. यासाठी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या बियाणांची गुणवत्ता तपासूनच बियाणे वाटप करण्यात यावे जमिनीची गुणवत्ता राखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबरोबरच पीक विमा योजनेचीही प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच नागपूर, सोलापूर, औरंगाबाद या तीन जिल्हयातील दुष्काळी भागामध्ये लवकरच कृत्रिम पाऊस पाडण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत कृषिविषयक योजनांच्या आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाचे सादरीकरण कृषिसहसंचालक दिलीप झेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषि आयुक्त सुहास दिवसे यांनी मानले. यावेळी विभागीय कृषि विभागाचे कृषि अधीक्षक, विभागप्रमुख, कृषि अधिकारी उपस्थित होते.