नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगानं सर्व राज्यांना विश्वासात घेऊन परीक्षांबाबतचा निर्णय घ्यायला हवा, याप्रश्नी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधे संभ्रम आहे, असं त्यांनी आज सांगितलं.

परीक्षेचा निर्णय घेण्याआधी विद्यापीठ आयोगानं मार्गदर्शक तत्व जारी करायला हवीत असं ते म्हणाले. राज्यभरात कोरोनाची स्थिती चिंताजनक असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी राज्यसरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्र सरकारनंही याप्रकरणी राज्यांच्या पाठिशी उभं रहावं, असं आवाहन सामंत यांनी केलं आहे.