पुणे : ग्रामीण भागात होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मिशन मोडवर काम करण्याचा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
हवेली तालुक्यातील ग्रामपंचायत गुजर-निंबाळकरवाडी येथे कोरोनामुळे एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांसोबत जिल्हाधिकारी राम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा केली. यावेळी घडलेल्या घटनेबाबत येत्या 7 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या तसेच याबाबत फेरआढावा घेणार आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने वाटप करण्यात आलेल्या कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या इशाराही जिल्हाधिकारी राम यांनी दिला.
बैठकीस प्रांताधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, सरपंच व्यंकोजी खोपडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वैदकीय अधिकारी डॉ. ज्ञानदीप राजगे, आरोग्य सहायक शैलेश चव्हाण, ग्रामसेवक विशाल निकम, तलाठी विकास फुके, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने गावपातळीवर कोरोना विषयक जनजागृती वर द्या, कोरोनाबाधित रुग्णांबाबत दररोज अहवाल सादर करा, गृह विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींसाठी गृह विलगीकरण संच उपलब्ध करुन द्यावे, पल्स ऑक्सिमिटर सरपंच आणि ग्रामसेवक यांना देऊन वापर करण्याबाबत त्यांना माहिती द्या आदि सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
गावामध्ये मोबाईल रुग्णवाहिका सकाळी आणि संध्याकाळी फिरवून गंभीर रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहचवा, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोठेही खाटांची कमतरता नाही त्यामुळे खाटा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होणार नाही याबाबत विशेष काळजी घ्या अन्यथा संबंधितांवर कडक करण्यात येईल. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराबाबत तक्रारी येता कामा नये, अशा कडक सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.