नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना स्मार्टफोन आणि टॅबलेटसारख्या उपकरणांचा वापर करू द्यावा अशी सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना केली आहे.
यामुळे रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसोबत व्हिडिओकॉन्फरन्स सारख्या सेवेचा वापर करून संपर्कात राहता येईल, तसंच त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यातही मदत होईल असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
रुग्णांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी दिलेली असली, तरीदेखील याबाबत अनेक रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आरोग्य मंत्रालयाला मिळाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही सूचना जारी करण्यात आली आहे.
त्या त्या राज्यांमधे अशा उपकरणांच्या वापरासाठीचं वेळापत्र आणि निर्जंतुकीकरण यादृष्टीनं नियमावलीही तयार करता येऊ शकेल असं यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.