यशस्वी  एज्युकेशन  सोसायटीच्या आयआयएमएस च्या वतीने आयोजित  कार्यशाळा  संपन्न

पिंपरी : आपल्या दररोजच्या जीवनात प्रत्येकाने स्वतःमधील क्षमता विकसित करणे, हाच यशस्वी जीवनाचा पाया आहे असे मत प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते विवेक डोबा यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएम) च्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत व्याख्यान देताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण व्यस्त असल्याने आपल्याला स्वतःमधील वेगळेपणा, आपले स्वतःचे वैशिष्ट्य हे समजून घ्यायलाही सवड होत नसल्याने, आपल्याला अपेक्षित यश प्राप्त होण्यात अडचणी येतात, म्हणूनच प्रत्येकाने आपल्यातील खासियत, इतरांपेक्षा आपल्यात काय वेगळे आहे हे जाणून घेतले पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो, तीच असते खरी व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात. व्यक्तिमत्व विकासामुळे निराशेत अडकलेली व्यक्ती पुन्हा कार्यक्षम, उत्साही आणि प्रसन्न होते, आणि या सकारात्मक बदलामुळे त्या व्यक्तीच्या प्रत्येक कामात सृजनशीलता आणि ऊर्जेचा संचार झाल्याने यशप्राप्ती निश्चित होते, असेही डोबा यावेळी म्हणाले.

आपल्या सभोवताली असलेली बहुतांश माणसे ज्या पद्धतीने विचार करणारी असतात, अगदी त्याच प्रकारे आपलीही विचारसारणी होऊ लागते, म्हणूनच प्रत्येकाने अतिशय प्रयत्नपूर्वक एखाद्या घटनेकडे आपण कशी प्रतिक्रिया देतो, आपली नेमकी विचारसारणी कशी आहे, याचा सातत्याने अभ्यास करून जर विचारांची दिशा चुकीची असेल तर, ती आधी प्रांजळपणे मान्य करून स्वीकारली पाहिजे. त्यानंतर सततच्या प्रयत्नातून योग्य विचारसारणी विकसित केली पाहिजे. असेही विवेक डोबा यांनी सांगितले.

शिक्षकांनी तर विद्यार्थ्याना अध्यापन करण्याअगोदर दररोज आपल्यातील उत्साहाची, ऊर्जेची, सकारात्मकतेची पातळी स्वतःच तपासून घेतली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्येही ती सकारात्मकता रूपांतरित होईल. असेही ते म्हणाले.

“व्वा !! मस्त पाऊस पडतो आहे” असेही म्हणता येते किंवा “अर्रर्र !! पावसाची नुसती रिपरिप, वैताग आला आहे” असेही म्हणणारी माणसे असतात. फरक आहे तो फक्त दृष्टीकोनाचा असे त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार नजीकच्या भविष्यात प्रत्येक कुटुंबामागे एका समुपदेशकाची, मानसोपचार तज्ञाची गरज लागणार असल्याचे सांगितले जाते, ही नक्कीच आपल्या सर्वाना चिंता लावणारी बाब आहे. प्रत्येकजण पळतो आहे, शिक्षणाच्या मागे, नोकरीच्या मागे,पैशाच्या मागे, नातेसंबंध टिकवण्याच्या मागे, एक ना अनेक, प्रत्येकाचे पळण्याचे कारण वेगळे, प्रवास वेगळा आहे, मात्र ही पळापळ करताना आपण जीवनातील आनंद तर हरवत नाही आहोत ना याकडे लक्ष द्यायला  हवे.

आपल्या आयुष्यातील समस्यांना तोंड देताना, आपण फक्त सहानुभूती देणाऱ्यांची मदत घेतो का? समस्येवरचा उपाय सांगणाऱ्याकडे धाव घेतो हे तपासा. आज नोकरी करणारा माणूस नोकरीत समाधानी नाही, तो व्यवसाय करण्याचा विचार करू लागला आहे, तर दुसरीकडे व्यवसाय करणाऱ्याला पुन्हा नोकरीच बरी असे वाटू लागले आहे. असंख्य प्रश्नांची न दिसणारी ओझी आज प्रत्येकाच्या खांद्यावर आहे. तेव्हा गरज आहे, ती क्षणभर थांबून ही ओझी हलकी वाटावीत म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःवरचा खरा आत्मविश्वास वाढविण्याची. असा मोलाचा संदेश विवेक डोबा यांनी दिला.

या कार्यशाळेत त्यांनी काही उदाहरणे, किस्से सांगत व काही गमतीशीर खेळाद्वारेही मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे, शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ.सुनिता पाटील, संचालक संजय छत्रे, अजय रांजणे यांच्यासह संस्थेचे सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पुष्पराज वाघ यांनी केले. तर आभारप्रदर्शन संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांनी केले. या कार्यक्रमासाठी पवन शर्मा यांनी विशेष सहकार्य केले.