नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आज ‘राष्ट्रीय डिजीटल आरोग्य’ अभियानाची घोषणा केली. या अभियानाअंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आरोग्याविषयक इतिहासाचा तपशील एकाच वेळी उलपब्ध व्हावा यासाठी डिजीटल आरोग्य ओळखपत्र दिलं जाणार आहे.

देशाच्या चौऱ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य समारोह आज नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पार पडला. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, देशाला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली.

या अभियानामुळे देशाच्या आरोग्यक्षेत्रात मोठी क्रांती घडून येईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. देशानं प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला हवं, आपल्या विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून आपण देश तसंच आंतरराष्ट्रीय बाजारासाठी उत्पादनं बनवायला हवीत असं ते म्हणाले.

कोरोनाच्या संकटकाळातही देशाच्या नागरिकांनी न डगमगता आत्मनिर्भर भारत घडवण्याचा संकल्प हाती घेतला असल्याचं ते म्हणाले. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतकऱ्यासह संपूर्ण कृषी क्षेत्र आत्मनिर्भर करण्याला प्राधान्य दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

यादृष्टीनं कृषी क्षेत्राकरता आधुनिक पायाभूत सुविधा उभारता याव्यात याकरता एक लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा निधी उभारला असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. हे लक्षात घेऊनच ३० वर्षांनंतर देशाचं नवं शैक्षणिक धोरण आणलं आहे. या धोरणामुळे जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आत्मनिर्भर भारतात डिजीटल इंडियाची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचं ते म्हणाले. २०१४ पर्यंत देशातल्या केवळ ५ डझन ग्रामपंचायती फायबर ऑप्टीक्सनं जोडल्या होत्या, मात्र गेल्या पाच वर्षात दीड लाख ग्रामपंचायती फायबर ऑप्टीक्सनं जोडल्या गेल्या अशी माहिती त्यांनी दिली.

आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात महिला सक्षमीकरणाचं महत्व लक्षात घेऊन आपण काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आत्तापर्यंत देशात ४० कोटी जनधन बँक खाती सुरु झाली आहेत, त्यापैकी २२ कोटी खाती महिलांची असल्याचं ते म्हणाले.

राष्ट्रीय छात्र सेनेचा देशाच्या सीमाभागापर्यंत विस्तार करण्याचा मनोदयही प्रधानमंत्र्यांनी आज व्यक्त केला. याअंतर्गत सुमारे एक लाख छात्र सैनिकांना प्रशिक्षण देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या तीन लसींचं काम सुरु आहे.

वैज्ञानिकांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर या लसींचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाईल, तसंच देशातल्या प्रत्येकाला लस मीळेल अशा रितीनं नियोजनही केलं आहे असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. मागच्या वर्षी लाल किल्ल्यावरूनच जल जीवन अभियानाची घोषणा केल्याची त्यांनी आठवण करून दिली.

या अभियानाला एक वर्ष पूर्ण होत असताना, देशात दररोज सुमारे एक लाख घरांना नळाद्वारे पीण्याच्या पाण्याची जोडणी दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. ७४वा स्वातंत्र्य दिन आज राज्यासह देशभरात हर्षोल्हासात साजरा होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम होत आहेत.