नवी दिल्ली : प्रथमच आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार 2020, आज राष्ट्रपती भवनातून प्रदान केले. या पुरस्कार विजेत्यांचे यश हे देशातील क्रीडा क्षेत्रातील प्रचंड संभाव्यतेचे स्मरण करुन देणारे आहे, असे राष्ट्रपती याप्रसंगी म्हणाले.
राष्ट्रपती म्हणाले, भारत क्रीडा क्षेत्रातील एक महान शक्ती म्हणून उदयास येईल आणि 2028 ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या अव्वल दहा देशांमध्ये स्थान मिळवेल. मला खात्री आहे, आपण हे ध्येय साध्य करु, असे ते म्हणाले. देशातील बेंगळुरु, पुणे, सोनपत, चंदीगढ, कोलकाता, लखनऊ, दिल्ली, मुंबई, भोपाळ, हैदराबाद आणि इटानगर अशा 11 स्थानांवरुन अधिकारी, क्रीडापटू आणि प्रशिक्षकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती आणि त्यांनी स्वागतपर भाषण केले.
राष्ट्रपती पुढे म्हणाले, कोविड-19 चा क्रीडा क्षेत्रावरही विपरीत परिणाम झाला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आपल्या देशातील क्रीडा घडामोडींवर परिणाम झाला आहे. सराव आणि स्पर्धांच्या अभावामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मनोधैर्य कमी होऊ शकते, जे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक तयारीसाठी मोठे आव्हान आहे. त्यांनी आनंद व्यक्त केला की, हे आव्हान पार करण्यासाठी ऑनलाइन कोचिंग आणि वेबिनारच्या माध्यमातून खेळाडू व प्रशिक्षकांना जोडले आहे. ते म्हणाले, आजचा कार्यक्रम म्हणजे जागतिक संक्रमण परिस्थितीतही क्रीडा क्षेत्राशी संबंधित उपक्रम सुरु ठेवण्याचा प्रयत्न आहे.
आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रातील वैविध्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, आज पुरस्कार प्राप्त करणारे खेळाडू 20 पेक्षा अधिक क्रीडा प्रकाराचे प्रतिनिधीत्व करतात. आपले पारंपरिक खेळ कबड्डी, खो-खो आणि मल्लखांब यांची वाढती लोकप्रियता सामान्य जनतेला खेळाशी जोडण्यात मदत करेल. आज, क्रिकेट आणि फुटबॉल याव्यतिरिक्त, वॉलीबॉल आणि कबड्डीच्या लीग स्पर्धांना लोकप्रियता मिळत आहे, हा आनंददायी बदल आहे.
राष्ट्रपती म्हणाले, सर्व भागधारकांच्या सहभागाने क्रीडा संस्कृतीचा प्रसार करता येऊ शकतो. हे केवळ सरकारची जबाबदारी नाही. क्रीडा क्षेत्रातील गुंतवणूक ही देश-उभारणीसाठीचे सामुहिक प्रयत्न आहेत ज्यामुळे समाज मजबूत होतो. त्यांनी आनंद व्यक्त केला की, अनेक कॉर्पोरेटस, एनजीओ आणि शैक्षणिक संस्था क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सामूहिक प्रयत्नातून भारत क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य राष्ट्र म्हणून उदयास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी क्रीडा पुरस्कार दिले जातात. राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार गेल्या चार वर्षातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान केला जातो, अर्जुन पुरस्कार सुद्धा चार वर्षे सतत उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान केला जातो, तर द्रोणाचार्य पुरस्कार विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पदक विजेत्यांच्या प्रशिक्षकांना दिला जातो. धान्यचंद पुरस्कार क्रीडा विकासातील आजीवन कामगिरीसाठी आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार क्रीडा प्रोत्साहन आणि विकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या कॉर्पोरेट संस्थांना (खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील) दिला जातो. आंतर-विद्यापीठ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मौलाना आझाद कलाम चषक प्रदान केला जातो. यासह, तेन्झिंग नॉर्गे नॅशनल अॅडव्हेंचर अवॉर्ड देऊन देशातील लोकांमध्ये साहसीपणाची भावना जोपासली जाते.