5 जानेवारी 2020 रोजी प्रवेश परीक्षा

मुंबई : सैनिक शाळा सातारा येथील सन 2020-21 च्या सत्रातील ६ वी आणि ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी ठराविक नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज 5 ऑगस्ट 2019 ते 23 सप्टेंबर 2019 या कालावधीत ऑनलाईन भरायचे आहेत. या प्रवेशांसाठी 5 जानेवारी 2020 रोजी प्रवेश परिक्षा होणार  आहे. सैनिक शाळा सातारा संरक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त अधिपत्याखाली 1961 साली स्थापन झाली आहे.

   ऑनलाईन अर्ज भण्यासाठी www.sainiksatara.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट आपल्यासोबत ठेवावा. ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेड प्रत व डिमांड ड्राफ्ट आणि सोबतची जोडपत्रे सैनिक शाळा साताराच्या कार्यालयात पोहोचवण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2019 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी उमेदवार 1 एप्रिल 2008 ते 31 जुलै 2010 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा. इयत्ता नववीतील प्रवेशासाठी उमेदवार  1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2007 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा व सध्या मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असावा. इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजीमधून असतील. इयत्ता सहावीसाठी 60 जागांसाठी प्रवेश दिला जाईल,  तर नववीतील प्रवेशासाठी 7 जागा उपलब्ध असणार आहेत.

 

सहावी आणि नववीतील १५ टक्के जागा अनुसुचित जाती, ७.५ टक्के जागा अनुसुचित जमाती, तर २५ टक्के जागा सैनिक सेवेतील आजी व माजी कर्मचाऱ्यांची मुले यांच्यासाठी राखीव (अ. ज. व अ. जा. यांच्या राखीव जागा सोडून) असतील.

सामान्य वर्ग, संरक्षण दल, उमेदवारांसाठी 400 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल, तर अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीमधील उमेदवारांसाठी 250 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. यासाठी मुलांच्या जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत जोडणे बंधनकारक आहे.