नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद, वांशिक हिंसा, कट्टरवाद आणि आणि गुप्त अणू व्यापार याच गोष्टीं गेल्या 7 दशकात पाकिस्ताननं दिमाखात मिरवल्या असल्याची टीका भारताने केली आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री हे सतत कांगावा करणारे असून विष पसरवत असल्याची टीकाही भारतान संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये केली आहे. पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं भारतावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तराच्या अधिकारात उत्तर देताना भारताचे संयुक्त राष्ट्रातल्या स्थायी प्रतिनिधींचे प्रथम सचिव मिजीतो विनितो यांनी ही टीका केली आहे.

जे द्वेष आणि हिंसेला चिथावणी देत आहेत त्यांच्यावर बंदी घालावी असं पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी महासभेत केलेल्या भाषणात म्हटलं होत. मात्र त्यांची ही टीका स्वतःच्याच देशाबद्दल होती का ? असा सवालही भारतानं उपस्थित केला. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या उच्च स्तरीय सभेमध्ये जम्मू काश्मीरसह भारताच्या अंतर्गत बाबींबाबत वक्तव्य केल होत. त्यांनी नेहमीप्रमाणे भारताबद्दल ही कडवट टीका करायला सुरुवात केल्यावर भारतीय प्रतिनिधीनं महासाभेतून सभात्याग केला होता.

पाकिस्तानकडे स्वतःबद्दल काहीही सांगण्यासारखे नाही. जगाला कोणत्याही चांगल्या सूचनाही हा देश देऊ शकत नाही. त्याऐवजी खोटेपणा, चुकीचे माहिती पसरवणं आणि युद्धज्वर आणि प्रतिमा मलीन करण्याचं काम पाकिस्तानं या व्यासपीठावरून केलं असल्याची टीकाही भारतानं केली.

जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हा निःसंदिग्धपणे भारताचा अविभाज्य आणि अंतर्गत भाग आहे, असाही भारतीय प्रतिनिधींनी यावेळी पुनरूच्चार केला. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे.