मुंबई : जालना विधानसभा मतदारसंघातील विद्युत विकास कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करून कामे मार्गी लावण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई येथे महावितरणच्या मुख्यालयात जालना विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न व वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल व महावितरणचे प्रभारी संचालक (संचालन) सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती. तर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते, मुख्य अभियंता भुजंग खंदारे, अधीक्षक अभियंता संजय सरग, प्रभारी अधीक्षक अभियंता संजीव राठोड आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जालना शहरात मोंढा भागात नवीन उपकेंद्र उभारणे, शहरात भारक्षमतेनुसार नवीन 10 रोहित्रे बसवणे, सामनगाव, सावंगी तलाव व जामवाडी इथे 33 केव्ही उपकेंद्र उभारणे, मानेगाव, सेवली, राममूर्ती, भाटेपुरी, गोंदेगाव, नागेवाडी येथील 33 उपकेंद्रात 5 एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसवणे, हिस्वन व हिवरा रोशनगाव येथील 33 केव्ही उपकेंद्रातील 3.15 एमव्हीए रोहित्रांची 5 एमव्हीएपर्यंत क्षमतावाढ करणे आदी कामांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तांत्रिक पडताळणी करून या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना डॉ.नितीन राऊत यांनी सहव्यवस्थापकीय संचालक, औरंगाबाद यांना दिल्या.
याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन रोहित्रे बसवणे, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत 7.5 एचपी पंपांसाठी जालना तालुक्यातील गावांचा समावेश करणे आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात व इतर विविध वीज प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.