नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकशाही प्रकीयेद्वारे निवडून आलेले शासन प्रमुख म्हणून सलग विसाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळानं आज त्यांचं अभिनंदन केलं. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.

मोदी यांनी कारभारात सुधारणा केल्या, महत्वाच्या क्षेत्रामध्ये सुधारणा केल्या तसंच भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं, असं जावडेकर म्हणाले. गरीब लोक आणि वंचित घटकाचं जीवनमान प्रधानमंत्र्यांनी उंचावल, असं ही ते म्हणाले.

उद्यापासून कोरोना विषाणूबाबत जनजागृती मोहिम सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला असल्याची माहिती, जावडेकर यांनी दिली. कोरोनावर सध्या कोणतही हुकमी औषध किंवा लस उपलब्ध नाही, त्यामुळे मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुणं हाचं कोरोनापासून बचाव करण्याचा मार्ग आहे, असं ते म्हणाले.

ही मोहिम पोस्टर, बॅनर्स आणि समाज माध्यमांद्वारे राबवली जाणार आहे.

देशात नैसर्गिक वायू विपणन क्षेत्रात करायच्या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बातमीदारांना याबाबत माहिती दिली.

देशात नैसर्गिक वायूच्या दरात पारदर्शकता आणण्यासाठी सरकार ई-निविदांचं प्रमाणिकरण सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.