पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 38 व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांना अभिवादन केले असून शहरवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीतून, परिश्रमातून आकाराला आलेले हे शहर आज वेगाने विकसित होत आहे. राज्यातील आणि देशातील नागरिकांच्या पसंतीचे शहर ठरले आहे, याचा आपल्या सर्वांना आनंद आहे. या शहराच्या जडणघडणीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आजी माजी महापौर, आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि समस्त पिंपरी-चिंचवड शहरवासियांचे योगदान असून त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो व सर्वांना वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असा लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर गतिशील करण्याचा आपण सर्व मिळून एकजुटीने प्रयत्न करूया.
सध्या संपूर्ण जग, देश, राज्याबरोबर पिंपरी-चिंचवड शहरवासीय मोठ्या निर्धाराने कोरोना संकटाचा मुकाबला करत आहेत. कोरोनाचे हे संकट दूर होईपर्यंत आपण सर्वांनी मिळून मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाहणे, हात स्वच्छ धुणे, घर -परिसर-शहर व वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासियांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून लवकरात लवकर शहर कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया. आजच्या वर्धापनदिनी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.