मुंबई : राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मदत व पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी राज्यातील पूर परिस्थितीविषयी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच पूरग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून लोकांच्या सुरक्षिततेबद्दल सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सह संचालक अरुण उन्हाळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत लोकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. त्यांच्या निवासाची, भोजनाची व आरोग्यविषयक सुविधांची व्यवस्था करावी. तसेच राज्यस्तरीय अधिक मदत हवी असल्यास त्याची तातडीने मागणी करावी अशा सूचना त्यांनी कोल्हापूर, सांगली व रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधताना दिल्या.
कोल्हापूरच्या पूर परिस्थितीमुळे 204 गावे वेढली गेली होती, त्यातील 11 हजार 432 लोकांना पूरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सध्या 18 गावे पुराने वेढलेली आहेत. तसेच कोल्हापूर येथे 41 बोटींचा वापर करुन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. NDRF च्या 8 बोटी कार्यरत असून 3 पथक मदतकार्यात सक्रिय आहेत. नेव्ही व कोस्ट गार्डची मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे यांनी यावेळी दिली.
त्याचप्रमाणे NDRF च्या उपलब्ध असणाऱ्या 22 पथकांपैकी 13 पथके शोध व बचाव कार्यात कार्यरत असून 3 पथके मुंबई, 2 पथके पुणे, 1 पथक नागपूर या ठिकाणी राखीव आहेत. तर ओडिसा येथून आलेल्या 3Bn NDRF च्या एकूण 5 पथकांपैकी 3 पथके कोल्हापूर येथे विमानाने रवाना झाली होती. मात्र खराब वातावरणामुळे सदर विमान कोल्हापूर येथे उतरु शकले नसल्याने पुणे येथे परत गेले आहे. पुढील हवामानाचा अंदाज घेऊन सदर पथके पुन्हा रवाना होतील.
तसेच ओडिसा येथून आलेल्या 3Bn NDRF च्या एकूण 5 पथकांपैकी 2 पथके सांगली येथे पोहचत आहेत. नेव्हीचे 22 जवानांचे पथक, गोवा तटरक्षक दलाचे (कोस्ट गार्ड) एक हेलिकॉप्टर एका बोटीसह शोध व बचाव कार्यासाठी कोल्हापूर येथे दाखल झाले आहे. त्याचप्रमाणे आर्मीचे पथकही बोटीसह शोध व बचाव कार्यात सहभागी आहे.
सिंधुदुर्ग गोवा तटरक्षक दलाचे एक पथक एका बोटीसह तिल्लारी धरण क्षेत्रात शोध व बचाव कार्यासाठी काल दाखल झाले असून सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी शोध व बचाव कार्य चालू असून पुणे, ठाणे, पालघर, औरंगाबाद व नाशिक या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.