नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात ७२ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. याबरोबरच देशातला कोरोनामुक्तीचा दर वाढून ८८ टक्क्याच्या पुढे गेला आहे. आत्तापर्यंत देशभरातले ६५ लाख ९७ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

याच काळात देशभरात ६१ हजार ८७१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली. यामुळे देशभरातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४ लाखापेक्षा जास्त झाली आहे.

या चोवीस तासात देशभरात १ हजार ३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे देशभरातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १४ हजार ३१ झाली आहे. सध्या देशातला कोरोनामृत्यू दर १ पुर्णांक ५२ शतांश टक्के इतका आहे.

देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही घट  झाली. सध्या देशभरात ७ लाख ८३ हजार कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.