The President, Shri Ram Nath Kovind presenting the Bharat Ratna Award to Shri Nanaji Deshmukh (posthumously), at an Investiture Ceremony, at Rashtrapati Bhavan, in New Delhi on August 08, 2019.

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. नानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात आज देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावर्षी भारतरत्न पुरस्कार घोषित झालेल्या माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ,नानाजी देशमुख(मरणोत्तर), प्रख्यात गायक भूपेन हजारीका(मरणोत्तर) यांना  सन्मानित करण्यात आले.

नानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह यांनी तर भूपेन हजारीका यांचे पुत्र तेज हजारीका यांनी  पुरस्कार स्वीकारला. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.

नानाजी देशमुख प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते होते. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले.  हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी 11 ऑक्टोबर 1916  मध्ये  नानाजी देशमुख यांचा जन्म झाला. नानाजी यांनी भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती ठेवून देशभर रचनात्मक व शाश्वत विकास साधणारे समाजकार्य केले. पांचजन्य , राष्ट्रधर्म आणि स्वदेश या नितकालिकांचे  जबाबदारी त्यांनी सांभाळली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही नानाजी देशमुख सहभागी झाले. देशातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात त्याचे मोलाचे योगदान राहिले आहे. गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतीचा विकास व प्रसार,गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य,आरोग्यधाम योजनेंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन आदी महत्त्वपूर्ण कार्य नानाजींनी केले.