नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. खडसे यांनी गेल्या बुधवारी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळेच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला. आपण ज्या निष्ठेनं भाजपात काम केलं, त्याच निष्ठेनं राष्ट्रवादीतही काम करणार, पक्ष वाढीसाठी मेहनत घेणार अशा शब्दात खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसता, तर कदाचित कायमच घरी बसलो असतो. अशावेळी पक्षात प्रवेश दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभारही मानले.
भाजपामध्ये असताना आपल्यावर घोटाळ्याचे खोटे आरोप झाले, गेली चार वर्ष आपण अन्याय सहन केला, अशी सल खडसे यांनी यावेळी व्यक्त केली.
खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानं आजचा दिवस आनंदाचा आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे यांचं पक्षात स्वागत केलं. खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे खानदेशात सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कामाला खऱ्या अर्थानं गती मिळेल, पक्षाची ताकद वाढेल असंही पवार म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही, त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राज्य मंत्रिमंडळात बदल होईल, यासंदर्भातल्या सर्व बातम्या निराधार आहेत, मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
यावेळी एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे – खेवलकर, जळगाव जिल्हा दूध महासंघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी यांच्यासह भाजपाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला.