मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव घसरले.
सकाळी उन्हाळ कांद्याची आवक १७ हजार ६९० क्विंटल तर लाल कांदा ८० क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याला किमान सरासरी ४ हजार रुपये तर लाल कांद्यालाही साधारणता इतकाच भाव मिळाला.
नाफेडने परदेशी कांदा ५ हजार रुपये क्विंटल या दराने आयात करण्याऐवजी राज्यातल्या शेतकऱ्यांकडून याच दराने कांदा खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. नाशिकमध्ये कांद्याचे भाव दोन दिवसांपासून घसरत आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे.
दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकरी आपला कांदा बाजार समितीत आणत आहेत परंतु बाजारभावात गेल्या दोन दिवसांपासून मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
सध्या नाफेडच्या माध्यमातून १५ हजार टन कांदा आयात केल्याने राज्यातल्या कांद्याचे भाव पडून कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्याऐवजी नाफेडने राज्यातल्या उत्पादकांचा ५ हजार रुपये क्विंटल या दराने खरेदी करुन कांदा उत्पादकांचे होणारे नुकसान थांबवावे, असे दिघोळे यांनी नाफेडला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.