मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा आज राज्यभरात वीज देयक होळी आंदोलन करत आहे. टाळेबंदीच्या काळातली वीज देयके माफ करण्याचे आश्वासन मोडून महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करत, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करत असल्याचे, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

उस्मानाबाद इथे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयापुढे हे आंदोलन केले. राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत वीज देयकांची होळी आंदोलकांनी केली.

धुळ्यात माजी संरक्षण राज्य मंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

तर, गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी इथे भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात वीज बिलांची होळी करुन राज्य सरकारचा निषेध केला.

वाशिम इथे भाजपाचे राज्य महासचिव राजू पाटील राजे यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी स्थानिक महावितरण कार्यालयासमोर विज बिल होळी आंदोलन केले.