नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत चढ उतार य़ेऊनही आर्थिक सुधारणांची गती चांगली असल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते आज फिक्की, अर्थात भारतीय उद्योग आणि वाणिज्य महासंघाच्या ९३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

आर्थिक निर्देशक आशा वाढवणारे असून या कठीण काळात देश म्हणून आपण बरेच काही शिकलो. याचे श्रेय उद्योजक, तरुण, शेतकरी आणि सर्वसामान्य भारतीयांना जाते, असे ते म्हणाले.

जागतिक महामारीच्या काळात आपल्या नागरीकांचे संरक्षण करण्यात भारताने यश प्राप्त केले असून, देश इतर क्षेत्रातही पुन्हा उसळी घेऊ शकतो, असे ते म्हणाले.

कोविडच्या काळातही परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात विक्रमी थेट गुंतवणूक केली आहे, असे त्यांनी सांगितले.

देशातल्या खाजगी क्षेत्राने देशांतर्गत गरजा पूर्ण करतानाचे स्वतःची जागतिक प्रतिमाही निर्माण केली पाहीजे, भारतात दर्जेदार उत्पादन तयार व्हावी आणि भारतीय उद्योग जागतिक स्पर्धेसाठी सक्षम व्हावा हेच आत्मनिर्भर भारत अभियानाचे उद्दिष्ट आहे, असे मोदी यांनी सांगितले.

सर्व प्रकारच्या अनावश्यक चौकटी दुर करण्यासाठी सरकार सुधारणा करत आहे, कृषी क्षेत्रातल्या सुधारणा हे त्याचे उदाहरण आहे, असे ते म्हणाले.