मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकार योजनांचे फक्त भूमिपूजन करणार नसून, त्यांना गती देणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज औरंगाबाद इथे पाणी पुरवठा योजनेसह विविध चार विकास कामांचा प्रारंभ केल्यानंतर बोलत होते.

१ हजार ६८० कोटी रुपये खर्चाची नवी पाणीपुरवठा योजना, २०५२ पर्यंत शहराची लोकसंख्या ३३ लाख गृहीत धरुन तयार केली जात आहे. या योजनेच्या कोनशिलेचे अनावरण आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती वन आणि स्मारक, शहरालगत मिटमिटा परिसरात सफारी पार्क, तसेच औरंगाबाद शहरातल्या १५२ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा प्रारंभही मुख्यमंत्र्यांनी केला.

यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या गुंठेवारीचा प्रश्न सोडवण्याबाबत सूचना केली असल्याचे सांगितले.

उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पाणीपुरवठा योजनेसंदर्भात निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.