मुंबई (वृत्तसंस्था) : विकास प्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत तो पूर्ण करावा. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ मिळेल,असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ही आढावा बैठक काल मुख्यमंत्री निवासस्थानी झाली. पुणे आणि नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या हद्दीतल्या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णयही राज्यसरकारनं घेतला आहे.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत ९६० कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला असून  एकूण निधीपैकी सुमारे ५३ टक्के निधी मेट्रोसाठी खर्च करण्यात येत असल्याची माहिती प्राधिकरणाचे महानगर आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली. नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या कामांचे सादरीकरण महानगर आयुक्त शितल उगले यांनी केले.

  सध्या प्राधिकरणामार्फत सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा  विकास प्रकल्प सुरु असून त्यात विकासकामांसोबतच सौंदर्यीकरणावरही भर देण्यात येत असं त्यांनी सांगितलं. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.