नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे. या नव्या कायद्यांमुळे पिकांना मिळणारा हमीभाव सुरूच राहणार आहे; तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीही सुरूच राहील; हमी भाव आणि बाजार समित्या बंद होणार नाहीत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. मध्य प्रदेशातील रायसेन इथ आयोजित शेतकरी महासंमेलनाला त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं.

कृषी कायद्यांविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवला जात आहे; मात्र हे कायदे एका रात्रीत तयार झालेले नाहीत, गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात राज्यांशी कृषी क्षेत्रातील तज्ञांशी, अर्थतज्ज्ञ आणि शेतकऱ्यांशी चर्चा सुरू होती, असे पंतप्रधानांनी सांगितले. या कायद्याबाबत विरोधकांवर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले की, विरोधक आपल्या जाहीरनाम्यात या सुधारणांची घोषणा करत होते. पण आता कृषी कायद्यातील सुधारणांचं श्रेय आम्हाला का नाही ही त्यांची खरी पोटदुखी असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.