सांगली : नैसर्गिक आपत्तीच्या काळात आम्ही आपल्यासोबत सदैव मदतीला आहोत, असा दिलासा गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी पूरग्रस्तांना दिला.

डॉ. पाटील हे जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या आरोग्य सुविधेसाठी औषधे, वैद्यकीय पथकासह सांगलीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासमवेत 8 तज्ज्ञ डॉक्टरांसह, 4 फार्मासिस्ट, 4 सामाजिक कार्यकर्ते, 4 पॅरामेडिक्स असिस्टंट व इतर अशा 25 सदस्यांच्या वैद्यकीय मदत पथकासह 2 रुग्णवाहिका तसेच दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा होता.

भिलवडी ता. पलूसमधील माळवाडी, उमाजीनगर, लक्ष्मी चौक, अशा अनेक गावागावात जाऊन डॉ. पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून शासन आपल्या पाठिशी आहे, असा विश्वास नागरिकांना दिला. गावातली अवस्था बिकट असून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य आहे, अशा चिखलातून डॉ. पाटील यांनी मोटर वरून गावातील घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी केली. औषधाचा साठा किती आहे आणि येत्या काळामध्ये कोणती औषधे लागू शकतात याची माहिती घेऊन स्थानिकांना दिलासा दिला.

औषधांसोबतच गावातील लोकांना ब्लँकेट, चादरी देण्यात आल्या. यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, डॉ. अशोक ओळंबे, हरीश चंदानी, डॉ. कैलास अवसरे, डॉ. नरेश बजाज, संजय तिकडे, श्री. आठवले, प्रकाश पवार, जिल्हा परिषद सदस्य सुरेन्द्र वाळवेकर, सरपंच विजयकुमार चोपडे, भिलवडी पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे, रोहित नलावडे, अनु सौदागर, निलेश जाधव, यांच्यासह अनेक डॉक्टर्स व फार्मासिस्ट मदत कार्यात सहभागी झाले होते.