नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल २९ हजार ७९१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत देशातले ९६ लाख ९३ हजार १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोना संक्रमणात मोठी घट झाली आहे. सध्या देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांचं प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २ पूर्णांक ८० शतांश टक्क्यापर्यंत खाली आलं आहे.

गेल्या २४ तासात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत ५ हजार ४००नं घट होऊन ती २ लाख ८३ हजार ८४९ इतकी झाली आहे. याच काळात २५ हाजारापेक्षा कमी, २४ हजार ७१२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढून ९५ पूर्णांक ७५ शतांश टक्क्यांवर पोचलं आहे. दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्याही गेले १२ दिवस ४०० च्या खाली राहिली आहे. गेल्या २४ तासात देशात ३१२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ७५६ वर पोहोचली आहे. सध्या देशाचा कोरोना मृत्यूदर १ पूर्णांक ४५ शतांश टक्क्यावर स्थिर आहे.