नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रेक्झिटनंतरच्या व्यापार नियमांबाबत अनेक महिने चर्चा केल्यानंतर युरोपीय महासंघ आणि ब्रिटन यांच्यात काल व्यापार करारावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. युरोपीय समुदायातून बाहेर पडलेल्या ब्रिटीश सरकारनं करार झाल्याचं घोषित केलं.
प्रतिवर्ष ६ शे ६८ अब्ज पौंडांचा हा करार असून ब्रिटननं केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं. या करारामुळं नोकऱ्या तर वाचतीलच, पण देशातला व्यापारी माल युरोपच्या बाजारपेठेत कोणत्याही करांशिवाय विकता येणार आहे.
संपूर्ण युरोपसाठी हा करार फायदेशीर असून ३० डिसेंबरला ब्रिटनच्या संसदेत यावर मतदान होईल, असं जॉन्सन यांनी सांगितलं. हा करार समतोल असून ब्रिटन हा आमचा विश्वासार्ह भागीदार म्हणून कायम राहिला आहे, असं युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयन यांनी सांगितलं.
या कराराला युरोपीय नेते, युरोपीय संसद आणि ब्रिटन सरकार यांनी मंजुरी दिल्यावर येत्या १ तारखेपासून युरोपीय समुदायातून पूर्णपणे बाहेर पडणाऱ्या ब्रिटनला या समुदायातल्या इतर २७ देशांबरोबर कोणत्याही करांशिवाय व्यापार करता येणार आहे.