मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली महाविद्यालयं तसंच विद्यापीठांमध्ये रिक्त जागांवर प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती लवकरच केली जाणार असल्याचं, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते काल सोलापूर इथं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

राज्य शासनाची आर्थिक स्थिती बेताची असल्यानं अनेक भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. मात्र शिक्षणाच्यादृष्टीने प्राचार्य तसंच प्राध्यापकांची रिक्त पदं भरणं आवश्यक असल्यानं, महाविद्यालयं तसंच विद्यापीठांकडून रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली असल्याचं, सामंत यांनी सांगितलं.

शासनाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात एक स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र सुरु करण्यात येणार असून, प्रत्येक विद्यापीठात लवकरच विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यभरातली महाविद्यालयं येत्या सोमवारपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.