मुंबई (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशीचे आदेश देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असून तेच याबाबत योग्य तो निर्णय घेतील असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.

परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या कथित पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत, मात्र यात उल्लेख केलेले पैसे कुठे गेले याबाबत पुरावे नाहीत तसंच त्यावर परमवीर सिंग यांची स्वाक्षरी नाही असं ते यावेळी म्हणाले.

परमवीर सिंग यांची बदली झाल्यावर त्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले, मात्र मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर असताना त्यांनी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही असं ते म्हणाले.

सचिन वाझे यांना सोळा वर्षांपूर्वी पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं, आणि त्यांना सेवेत परत घेण्याचा निर्णय गृहमंत्र्यांच्या नसून परमवीर सिंग यांचाच होता. तसंच परमवीर सिंग यांनी आपली भेट घेतल्यानंतरच वाझे प्रकरणावर तपास करण्याची मागणी केली होती असं ते म्हणाले.

या प्रकरणाचा राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर कुठलाही परिणाम होणार नाही असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.