मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुराव्यासह केलेले आरोप पाहता, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. हा विषय महाराष्ट्र पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारा असल्याची टीका त्यांनी केली.
गृहमंत्री देशमुख हे दरमहा शंभर कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप परमबीरसिंग यांनी राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. गृहमंत्री देशमुख यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. परमबीर सिंग यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी रचलेलं षडयंत्र असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, परमबीरसिंग यांचं नाव असलेलं पण, स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. परमबीरसिंग यांचा नियमित वापरात असलेला ईमेल पत्ता आणि पत्र ज्यावरून आलं, तो ईमेल पत्ता वेगवेगळा आहे. सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं, मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं.