नवी दिल्ली : दिल्ली येथील ग्रेटर नोएडा भागात इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे 2 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान 14वी संयुक्त राष्ट्र संघांची भू व्यवस्थापन परिषद होणार असून, भारताकडे या परिषदेचे यजमानपद आहे. या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या परिषदेची ठळक वैशिष्ट्ये विषद केली. ते म्हणाले की, भू व्यवस्थापन आणि हवामान बदल ही जागतिक स्तरावरील समस्या असून, अडीचशे दशलक्ष लोक तसेच पृथ्वीचा एक तृतीयांश भाग प्रत्यक्षपणे परिणामांना बळी पडेल.
या समस्येला तोंड देण्यासाठी भारताने येत्या 10 वर्षात 50 लाख हेक्टर नापीक जमिनीला सुपीकतेत बदलण्याचे ठरविले आहे. तसेच या परिषदेच्या शेवटी नवी दिल्ली घोषणा या अंतर्गत देण्यात आलेल्या तरतूदींचे संपादन आणि उत्कृष्टता केंद्र देहरादून येथे स्थापन करण्यात येणार आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.
पर्यावरण मंत्र्यांनी भारताचे निरंतर, शाश्वत मार्गावरुन चालतांना आणि भू वापर तसेच भू व्यवस्थापनात सक्रीय सहभाग असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, उपरोक्त समस्या या जागतिक असून, त्यावर एकत्रित जबाबदारीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
या परिषदेत 196 देशांचे शास्त्रज्ञ, राष्ट्रीय प्रतिनिधी, स्थानिक प्रशासन, जागतिक व्यापार प्रतिनिधी, गैर सरकारी संघटना, युवक समुह, पत्रकार, आदी उपस्थित राहणार असून, स्वत:चे अनुभव ते या ठिकाणी या 11 दिवसांच्या परिषदेत विषद करतील.