नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सॉफ्टवेअर, म्हणजेच एनएमएमएस अॅप आणि एरिया ऑफिसर मॉनिटरिंग अॅप यांचं उद्घाटन केलं.
एनएमएमएस अॅप द्वारे महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांची वास्तव वेळेतली स्थळ छायाचित्रांसह उपस्थिती नोंदवता येणार आहे. कामगारांना वेगानं मोबदला मिळण्याबरोबरच, नागरिकांनाही कामावर लक्ष ठेवता येणार आहे.
एरिया ऑफिसर मॉनिटरिंग अॅपच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वेळेसह घटनांची नोंद ठेवता येणार आहे, तसंच ग्रामविकास मंत्रालयाच्या योजनांच्या अंमलबजावणीची छायाचित्रेही जोडता येणार आहेत. यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवता येणार आहे.
दोन्ही अॅपमुळं पारदर्शकता आणि अंमलबजावणीच्या उत्तरदायित्वात वाढ होणार असल्याचं नरेंद्र तोमर यावेळी म्हणाले. ही दोन्ही अॅप विविध भाषांमध्ये आणण्याची आणि संबंधितांना योग्य प्रशिक्षण देण्याची सूचनाही तोमर यांनी मंत्रालयाला केली.