मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी आषाढी वारीसाठी देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं येत्या गुरुवारी,१ जुलैला, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे शुक्रवारी, २ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान होणार आहे.

यंदा कोरोना प्रादुर्भावामुळं आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी रद्द करण्यात आली असली तरी ४३० दिंड्यांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीला प्रस्थान सोहळ्यावेळी उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आल्याचे आळंदी संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे प्रमुख विकास ढगे पाटील यांनी सांगितले. या सर्व प्रतिनिधींची १ जुलै रोजी कोरोना चाचणी करण्यात येणार असून, निगेटिव्ह अहवाल असणाऱ्यांनाच प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल असे ढगे पाटील म्हणाले.

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा, शुक्रवार २ जुलै रोजी पारंपरिक पद्धतीने प्रस्थान सोहळा होणार असून त्यानंतर, त्यानंतर १९ तारखेपर्यंत पालखी आजोळघरीच राहील. नंतर एसटी बसमधून माउलींच्या पादुका पंढरपूरकडे रवाना होतील. वाखरीपासून पुढील दीड किलोमीटर अंतर पायी जाण्यास शासनाने परवानगी दिली आहे.