पुणे : ग्रामीण भागातील कुटूंबांना घरगुती कार्यान्वीत नळ जोडणीद्वारे 55 लिटर दरदिवशी दरडोई पाणीपुरवठा करणेचे उद्दिष्ठ आहे. जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत 2 जुलै ते 7 ऑगस्ट या दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे.
हा आराखडा राबविण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने नुकतेच रोजी – कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार यांना गाव कृती आराखडा मधील माहितीचे संकलन, राबविण्याची प्रक्रिया, कोबो टुलद्वारे माहिती अपलोड याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत.), वरिष्ठ भुवैज्ञानिक, शाखा अभियंता, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार ,पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुकास्तरावरिल गटविकास अधिकारी, उप अभियंता-ग्रापापु, विस्तार अधिकारी (पंचायत) गटसमन्वयक, समुहसमन्वयक यांना झुम ॲपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तालुका पातळीवर सर्व गटविकास अधिकारी यांच्याकडुन दिनांक- 28 ते 30 जुलै दरम्यान ग्रामपंचायतींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये गाव कृती आराखडाबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंपऑपरेटर, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधी यांना झुम ॲपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दिनांक 4 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा स्तरावर सर्व गावांची गाव कृती आराखड्याची माहिती संकलीत होऊन गाव कृती आराखडयाची निर्मिती केली जाईल. दिनांक 5 ते 7 ऑगस्ट 2021 या कालावधीत तालुकास्तरावर आराखड्यांची पडताळणी होवून आवश्यक त्या सुधारणा केल्या जावुन असे आराखडे दिनांक-15 ऑगस्ट 2021 रोजीच्या ग्रामसभेत वाचन व मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत.
गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मिलींद टोणपे व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.सुरेंद्रकुमार कदम यांनी केले.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 22 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे, या अभियानात गाव पातळीवरील वैयक्तिक नळ जोडणीसाठी आराखडा तयार होईल. त्यासाठी तालुका व गाव पातळीवरील सर्वांनी सहभाग घ्यावा, असे निर्देश श्री. आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.