सांगली : शेतकरी, व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक या घटकाचे पुरामुळे नुकसान झाले असले तरी कोणीही खचून जावू नका. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून आपल्यामध्ये असलेले आपुलकीचे नाते बाळगूया,असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारती विद्यापीठ येथे सांगली शहर पूरग्रस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधताना दिला.
यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह शहरातील पूरग्रस्त नागरिक व व्यापारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आज सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पुरामुळे झालेले नुकसान भरुन न निघणारे आहे, पण कोणी खचू नका, राज्य सरकार आपलेच आहे. आपल्या दु:खाची सरकारला जाण आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी शासन प्रत्येक घटकाला मदत करेल. आता पूर ओरसत आहे, त्यामुळे पंचानामे करण्याचे काम गतीने पूर्ण करुन पूरग्रस्तांना न्याय दिला जाईल. पुरामुळे बाधित झालेला कोणताही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.
पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करण्याचे काम सुरु आहे. मदतीचे हे निकष 2015 सालचे आहेत. हे निकष बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. राज्य शासनाप्रमाणेच बँका, विमा कंपन्यांनीही पुढे येऊन पूरग्रस्तांना मदत करावी. राज्याच्या महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावेत, यासाठी संबंधितांची बैठक घेऊन तशा सूचना दिल्या आहेत. व्याज दर कमी करण्याबाबतही आवाहन केले आहे. यासाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येऊन याचा पाठपुरावा करावा असे, आवाहन त्यांनी केले. पूर व्यवस्थापनासाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे, याचा आराखडा बनविणे, नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे या सारख्या बाबींना आता प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, गेले वर्ष-दोन वर्ष आपण कोरोना या आपत्तीशी लढा देत आहोत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जीव वाचविणे महत्त्वाचे असल्यानेच निर्बंध लागू केले. दुसरी लाट आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. केंद्र सरकाराने संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असून त्या दृष्टीनेही काळजी घेणे आवश्यक आहे.
कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले.
व्यापारी संघटनांच्या वतीने शरद शहा यांनी मनोगत व्यक्त करुन व्यापाऱ्यांच्या समस्या मांडल्या.