मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या माथाडी कामगारांसाठी असलेल्या विविध माथाडी महामंडळांच्या धर्तीवर रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल. असं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. राज्यातल्या विविध कला क्षेत्रातल्या रंगकर्मीशी काल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयात संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्रा तर्फे अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री मेधा घाडगे, विजय राणे, आदी उपस्थित होते. राज्यातल्या कलाकारांची नोंदणी करण्याचं काम जिल्हास्तरावर करण्यात येत असलं तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ऑनलाईन कलाकार नोंदणी कशी सुरु करता येईल, याबाबत प्रयत्न करावेत असंही ते म्हणाले. म्हाडा आणि सिडकोच्या घरांमध्ये रंगकर्मीसाठी राखीव ठेवलेल्या सदनिकांमध्ये मुंबईमध्ये ५ टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये २ टक्के प्रमाण असावे अशी मागणी आपण यापूर्वीच राज्य शासनाकडे केली असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं. रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र या संस्थेतर्फे काही कायमस्वरुपी मागण्यांचं निवेदन यावेळी त्यांना देण्यात आलं.