मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातला शेतकरी आणि शेती हीच आपली प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांसाठी नव्या संकल्पनेतून काम करण्यात येत आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ते काल वाशिम इथं उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यामातून बोलत होते. कोरोना काळातही न थांबता शेतकरी शेतामध्ये राबराब राबत असल्याचं सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या मेहनतीवरच राज्याचा विकास होत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यापासून ते आताचा ई-पीक पाहणी प्रकल्पासारखे अनेक निर्णय, उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे कृषि संकुल असावे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील, असं आश्वासन त्यांनी दिलं. कृषिमंत्री दादाजी भुसे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, खासदार भावना गवळी, आदी मान्यवर उपस्थित होते.होते.