मुंबई (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गेले मागचे दोन तीन दिवस होत असलेला पाऊस आजही सुरु आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात काल रात्रीपासून अधून मधून जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासूनही अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे.रायगड आणि रत्नागिरीतही अधूनमधून मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस सुरु आहे.सिंधुदुर्गात काल रात्रभर संततधार पाऊस झाला. आजही जिल्हात अनेक ठिकाणी पावसाची रिपरीप सुरु आहे. हिंगोलीत गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पिंपरखेड शिवार इथं काल ओढ्याला आलेल्या पूरात एक शेतकरी बैलगाडीसह वाहून गेला. यात शेतकरी बचावला, मात्र त्याची तीन जनावरं वाहून गेली.इसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे काल धरणाचे ७ दरवाजे उघडून, नदीपात्रात ११ हजार ९५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं असा इशारा प्रकल्प कार्यालयानं दिला आहे. जास्तीच्या पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागातल्या सोयाबीनच्या पिकाचं नकसान झालं आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या सोयाबीनला पुन्हा मोड फुटू लागले आहेत.अकोला जिल्ह्यात अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. उस्मानाबादेतही गेले काही दिवस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे उस्मानाबादला पाणीपुरवठा करणारा तेरणा धरण १०० टक्के भरला असून, तलावातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.जालनाच्या घाणेवाडी इथला संत गाडगेबाबा जलाशय पूर्ण क्षमतेनं भरल्यानं, जलाशयाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलं आहे.