नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या वुहान शहरातून मायदेशी परत आणलेल्या ६४५ जणांना कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला नाही असं वैद्यकीय चाचणीतुन स्पष्ट झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.
ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. कोविड – २०१९ या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या केरळमधल्या तीन रुग्णांची प्रकृती आता स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, आपत्कालीन स्थिती उद्भवलीच तर त्यासाठी औषधांचा पुरेसा साठीही उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं. दरम्यान कोविड २०१९या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनला मदत म्हणून भारतातून काही अत्यावश्यक वैद्यक साहित्य पाठवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या संसर्गाची खात्री करण्यासाठी आवश्यक नमुना चाचण्यांसाठी मालदीव आणि अफगाणिस्तानला, तर रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी भुतानला भारतानं मदतीचा हात पुढे केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
सीमा भागात सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे, तसंच विमानतळावरच्या तपासणी यंत्रणाही सुरु असल्याची खात्री करुन घेतली जात आहे. प्रधानमंत्री कार्यालयासह इतर संबंधित मंत्रालयाचंही परिस्थितीवर लक्ष आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. सरकारनं आवश्यक औषधांचा साठाही करुन ठेवल्याचं ते म्हणाले.