नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज प्रयागराजहून स्वच्छ भारत कार्यक्रमाचा आरंभ केला. चंद्रशेखर आजादांच्या पुतळ्याला हार घालून आणि चंद्रशेखर आजाद उद्यानात रोप लावून त्यांनी स्वच्छता मोहिमेचा आरंभ केला. स्वच्छता मोहिमेचा महिनाभर चालणारा हा कार्यक्रम म्हणजे आजादी का अमृतमहोत्सव उपक्रमाचा एक भाग आहे. स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करुन कचरा निर्मूलनात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे तसेच पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लॅस्टिकचे उच्चाटन अशी या मोहिमेमागील उद्दिष्टे आहेत. देशभरातील 744 जिल्ह्यांमधील सहा लाख गावांमध्ये ही मोहिम राबवली जाणार आहे. त्यासाठी नेहरु युवा संघटन आणि इतर संलग्न युवा क्लब तसेच राष्ट्रीय सेवा योजनेशी संबधित संस्थांच्या माध्यमातून या मोहिमेला चालना मिळेल.